शरद पवारांवर ‘विश्वास’ नाही, शपथविधी होईपर्यंत ते काय करतील सांगता येत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवारांवर विश्वास नाही, असं वक्तव्य प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.

सध्याच्या घडामोडींबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की , “भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं वाटलं होतं, त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीसोबत जाण्याची आमची मानसिकता नव्हती. पण हा बदल आता स्विकारला पाहिजे. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत आहे. आपण मी उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता, त्यामुळे दगाफटका करणार नाही. मात्र नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचं काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण,पवारसाहेब अजून अजित पवारांनाच नाही समजले तर मला काय समजणार.”

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या ‘महाविकासआघाडी’नं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com