‘तुझ्यासारखा नमक हराम पू्र्ण दुनियेत सापडणार नाही’

नाशिक : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेरी नाव घेत तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये केले. सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी बहुजन वंचित आघाडीवरही टिका केली.

बहुजन वंचित आघाडीवर टिका करताना बच्चू कडू म्हणाले, सध्या निवणुकांचे वारे वाहत आहे. जातीची समीकरणं आहेत बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली. पण जो सर्वात वंचित आहे त्या शेतकऱ्यांची तिथे चर्चा मात्र होत नाही. सरकार कोणाचेही असो आम्ही मे महिन्यात कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा या मागणीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना घेराव घालणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि कांद्याच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी नंदुरबारच्या सभेत मागे एकदा बोलले होते की मी तुमचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे माझं सरकार आलं. म्हणून मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. पण मोदीला आता आठवण करून द्यावी लागणार आहे. तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हणले होते. त्यामुळे आम्ही त्यांचा बदला घेणारच. आपण स्वतःही मैदानात उतरायला तयार आहोत किंवा अर्जुन खोतकरांवा पाठीबा देऊ पण दानवेंना पाडणार. यापुढे शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.