आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त गावांत समावेश करावा, या मागणीसाठी श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाला तातडीने प्रस्ताव पाठविल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा – साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग  

श्रीरामपूर तालुक्यातील पशुधन व इतर शेतीची परिस्थिती बिकट झाली आहे. पाण्याची टंचाई जाणवत आहे. तरीही तालुक्याचा समावेश दुष्काळी गावात करण्यात आला नव्हता. त्यामुळे दुष्काळी उपाययोजना राबवण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत उपोषणावर तोडगा निघाला नव्हता. जोपर्यंत शासनाकडून निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती. हा विषय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात होते. मात्र आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम होते.

अखेर रात्री उशिरा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सदर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवला. हा प्रस्ताव पाठविल्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आमदार कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.