भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे ‘कोरोना’ च्या पार्श्वभुमीवर जनजागृती, सहा हजारांहून अधिक ‘मास्क’ व ‘सॅनेटायझर’चे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे कोरोना व्हायरस जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पाटील यांच्या कोथरूड येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तब्बल सहा हजारांहून अधिक मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस संसर्गासंदर्भात पाटील यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. मास्क आणि सॅनेटायझर यांचा तुटवडा असल्याचे, तसेच त्यांची चढ्या भावाने काळाबाजार करून विक्री होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. इतकेच नव्हे तर या संदर्भात कृतिशील जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आपल्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत मास्क आणि सॅनेटायझर वाटप देखील सुरू करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे विशेष संवाद मोहीमे माध्यमातून हे लोकप्रतिनिधी राज्यभरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठीचे खबरदारीचे उपाय समजावून सांगणार आहेत.

“कोरोना व्हायरस संसर्ग ही केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यापूर्वीच संवाद साधला आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जनहिताचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी सरकार व प्रशासनाला सर्वतोपरीने सहकार्य करण्यास वचनबद्ध आहेत”.
– चंद्रकांत दादा पाटील,
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी आमदार, कोथरूड विधानसभा मतदारसंघ