लातूर : 105 वर्षांंच्या आजोबांची अन् 95 वर्ष आजीची ‘कोरोना’वर मात; आमदार धीरज विलासराव देशमुखांनी शेअर केली सकारात्मक बातमी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याने बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मात्र अशा नकारात्मक वातारणातही रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढविणारी, उर्जा देणारी, एक सकारात्मक बातमी लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. 105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली आहे.

धेनू उमाजी चव्हाण (वय 105) आणि मोताबाई चव्हाण (वय 95 दोघही रा. काटगाव तांडा, कृष्णानगर, जि. लातूर) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्यांचे नाव आहे. कोरोनाच्या या भयानक स्थितीतही डॉक्टरांच्या प्रयत्नाने व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या विषाणूला परतवून लावू शकतो, हे या आजी- आजोबांनी सिध्द करून दाखवले आहे.

याबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी आजी- आजोबांचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील काटगाव तांडा येथील धेनू उमाजी चव्हाण आणि मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन आज कोरोनावर मात केली. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. कोरोना रुग्णांना धीर देणारी, त्यांचे मनोधैर्य वाढवणारे हे वृत्त असल्याचे आमदार देशमुख यांनी ट्विट करून म्हटले आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊन असल्याने सोशल मीडिया आणि टीव्हीवरच अनेकांचा वेळ जात आहे. त्यातच रुग्णालयातील विदारक दृश्य पाहून वेदना आणि दु:ख याशिवाय काहीच हाती लागत नाही. त्यामुळे, या आजी-आजोबाने कोरोनावर मात करुन कोरोनातून आपणही बरे होऊ शकतो, हा मोलाचा मंत्र दिल्याचे दिसून येत आहे.