तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांत तक्रार

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असून गुंड प्रवृत्ती आणि त्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशी माहिती स्वत: मोहिते यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

सुचित्रा आमले खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत. जमिनींच्या नोंदी, दाखले, रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करीत आहेत. तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरु केली. मात्र हे केल्यावर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही.

परंतु हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरत असल्याचे सांगितले जाते. म्हणून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरे वाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते-पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले. तक्रारीत तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या पाठीब्याने अवैध कामे होत आहेत असे म्हटले आहे.

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केलेले आरोप
– तालुक्यातील भीमा-भामा आणि इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा
– सरकारी गायरान व सेझ जागेत अवैध उत्खनन
– कोरोनाच्या लॉकडाऊन काळात चाकणमध्ये तलाठी, सर्कलच्या माध्यमातून बेहिशेबी रक्कम गोळा केली
– तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मात्र कोरोना काळात एकही बैठक झाली नाही.
– त्यांच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील रुग्णवाढ
– गुळाणी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण दाबले
– पतीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी तालुक्यात मोठी माया गोळा केली
– पती बाळासाहेब आमले गुंडांशी संबंधित असून माझा घातपात करतील