आमदार पिता-पुत्राचा भाजपात प्रवेश ?

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्यास भाग पाडणारे आ. अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश धुडकावून त्यांनी त्यांचा मार्ग मोकळा केला आहे.
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर अडचणीत आलेले आमदार पिता-पुत्र काही महिन्यांपासून तणावाखाली आहेत. अंतिम दोषारोपपत्र अद्याप न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे जामिनावर बाहेर आलेले आ. संग्राम जगताप व त्यांचे पिता आ  अरुण जगताप हे आ. संग्राम यांचे सासरे भाजप आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय गोटात सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवशी कोतकर समर्थक कर्डिलेंच्या प्रयत्नातून भाजपात डेरे दाखल झाल्यानंतर जगताप पिता-पुत्र देखील प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली होती.
महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 नगरसेवक विजयी झाले होते. तसेच एक अपक्ष त्यांच्यासोबत होता. त्यांनी 19 जणांची गटनोंदणी केली होती. भाजपकडे अवघे 14 नगरसेवक होते. तरीही त्यांनी शिवसेनेसोबत काडीमोड घेऊन महापौर व उपमहापौर पदाची जोरदार तयारी सुरू केली होती. भाजपासोबत जाऊ नये, असा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला होता. थेट पक्षाध्यक्षांचा आदेश धुडकावून लावत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बिनशर्तपणे भारतीय जनता पक्षाला महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नोटीस काढली आहे, असे जाहीर केले आहे. तसेच याला आ. जगताप पिता-पुत्र जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
 
राष्ट्रवादीच करणार हकालपट्टी
आ. जगताप पिता-पुत्र हे भाजपात प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्यांची हकालपट्टी करणार अाहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली. त्यामुळे जगताप यांची चांगलीच गोची होण्याची चिन्हे आहे.
‘पोलिसनामा’चा अंदाज खरा
भाजपाने सत्तचे समीकरण जुळविले आहे. त्यांचा महापौर राष्ट्रवादीच्या मदतीने होणार असल्याचा अंदाज सर्वप्रथम वर्तविला होता. शुक्रवारी झालेल्या राजकीय घडोमोडी पाहता तो अंदाज खरा ठरला.

आ. जगताप पिता-पुत्रांची शरद पवारांशी गद्दारी