भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत, आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी राजकीय नेत्यांकडून नाही तर नेटिझन्सकडून ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले आहेत.  थोर समाजसुधाकर गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आगरकर यांच्याऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याचा फोटो वापरला आहे.
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पडळकर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. अखेर आपली चूक लक्षात आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली असं सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे.

नेटिझन्सचा हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली. लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले ?  फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं आहे. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचे दिसून आलं असं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर ट्रोलिंगवर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, मी माझ्या ट्विटरवर गोपाळ गणेश आगरकर यांचा फोटो पोस्ट करत अभिवादन केले. मात्र, राष्ट्रवादीच्या लोकांकडून जाणुनबुजुन अशाप्रकारे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.