राष्ट्रवादीचा आ. जगतापांना पहिला झटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आ. जगताप समर्थकांना झटका देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर उद्धवराव दुसुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश धुडकावून लावत आ. संग्राम जगताप यांनी भाजपासोबत घरोबा केला होता. या प्रकाराची पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व 18 नगरसेवकांकडे लेखी खुलासा मागितला आहे. त्यांच्यावर कारवाईचे अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहेत. नगरसेवकांवर कारवाई करण्यापूर्वीच पक्षाने आ. जगताप यांना आज पहिला झटका दिला. जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागेवर पक्षातील ज्येष्ठ नेते उद्धवराव दुसुंगे यांची नियुक्ती केली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी दिलेल्या आदेशावरून पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिल्याची बाब स्वतः पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलावले होते. मात्र विद्यमान आमदार असूनही आ. संग्राम जगताप व आ. अरुण जगताप यांना निमंत्रणही दिले नव्हते. तेव्हापासून जगताप समर्थकात अस्वस्थता पसरली आहे. नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या खुलाशानंतर पक्षनेतृत्वाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वीच दरेकर यांची पदावरून हकालपट्टी करून पक्षाने जगताप यांना पहिला झटका दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दुसुंगे यांना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे.