भाजप आ. कर्डिले यांचे पुतणे राष्ट्रवादीत ! सुजय विखेंना मोठा धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले व देविदास कर्डीले यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेतेे मधुकरराव पिचड आदी उपस्थित होते.

आ. शिवाजी कर्डिले हे भाजपचे असून, त्यांनी विखे यांना भाजपात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्डिले यांची गोची करीत त्यांचे जावई आ. संग्राम जगताप यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभेची उमेदवारी दिली. जावयाच्या उमेदवारीवरून पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालेला असतानाच त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले व देविदास कर्डिले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्तिप्रदर्शन करीत जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी नगर दौऱ्यावर आहेत. दौर्‍याच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करीत रोहिदास व देविदास यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अध्यक्ष पवार यांनी त्यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे आ. कर्डिले व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.