आढळराव पाटील यांचा प्रचार आमदार लांडगे गट करणार नाही ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेनेकडून शिरुरचे उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीर होताच भोसरी भाजप गटाने तातडीची बैठक घेतली. आमदार महेश लांडगे गटातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. मात्र शिवसेनेकडे असणारा भोसरी विधानसभा मतदार संघ भाजपला सोडावा यासाठी हे ‘दबावतंत्र’ वापरलं जात असल्याची चर्चा आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय ? असा सवाल नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे ‘दबावतंत्र’ वापरलं जात असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून आलेले महेश लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

आमदार महेश लांडगे मात्र सध्या सावध भूमिकेत असल्याचे दिसत आहेत. लांडगे युतीधर्म पाळू असं म्हणत असताना त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र विरोधाची भाषा करत आहेत.

यापूर्वी मावळ लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रचार करणार अशी परिस्थिती असताना आता शिरुरमध्येही भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी तीच रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे मावळ पाठोपाठ शिरूरमध्येही शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता वरिष्ठ नेते यावर काय तोडगा काढणार यावर समिकरणे अवलंबून आहेत.