आमदार चव्हाण यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर समर्थकांचा जल्लोष, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

जळगावः पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणच्या अभियंत्याला खुर्चीला बांधून चपलेचा हार घातल्याप्रकरणी अटक झालेल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची 12 दिवसानंतर जामिनावर सुटका झाली. आमदार चव्हाण यांची सुटका होताच मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला.

आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या वीज समस्येबाबत जळगावच्या महावितरण अभियंत्याला दोरीने खुर्चीला बांधून चपलेचा हार घातला होता. या प्रकरणी त्यांना अटक झाली होती. अखेर 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर जळगाव मध्यवर्ती कारागृहबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. एवढेच नाही तर चाळीसगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशे वाजवत ट्रॅक्टरवर रॅली काढून जल्लोष केला. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.