विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला , मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नितेश राणेकडून खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  आज विधिमंडळाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणाला नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरून आता राजकारण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘नटसम्राट’ला भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘कॉमेडी सम्राट’ ने प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाला असा टोला विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला असे म्हणले. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना त्यांची भीती वाटत होती असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, असा सल्लादेखील उद्धव ठाकरे यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.

‘कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री!’

आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! “कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री?”, अशा शब्दांत भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललेच नाहीत असे सुद्धा नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

धन्यवाद प्रस्तावात जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री पूर्ण तासभर बोलले. पण या तासाभरात ते महाराष्ट्रात आलेच नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, पंजाबला गेले, यूपीत गेले, ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता खूप दिवस झाले, पूर्वी ते नवे होते. पण अजूनही मुख्यामंत्री यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातील भाषण यातील अंतर समजलेले नाही. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलावं लागतं, राज्यातील प्रश्नावर बोलावं लागतं. तसेच या एक तासाच्या भाषणात ते शेतकऱ्यांबाबत एकही मुद्दा बोलले नाहीत. तसेच ते बोंडअळी, खोडकिडी, वीजतोडणीबद्दल देखील बोलले नाही. महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज तोडली त्यांची काळजी नाही, पण मुख्यमंत्र्यांना दिल्ली बॉर्डरवरील सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाते त्याची चिंता. हे जे उत्तर होतं त्याला भ्रमनिरास हा शब्दसुद्धा अपुरा आहे अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.