शिवरायांच्या वेषातील ‘या’ आमदारानं नेत्याला केला मुजरा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात अधिवेशनात प्रकटताना दिसून आले. मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मागण्यांसाठी आज त्यांनी थेट महाराजांच्या भूमिकेत विधानभवनात प्रवेश केला. आमदार प्रकाश गजभिये नेहमीच वेगवेगळ्या वेशभूषा करुन आंदोलन करण्यासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्यानंतर गजभिये यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते टीकेचे लक्ष्य होऊ लागले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजभिये यांनी राज्य सरकारला खरमरीत प्रश्नही विचारले. मात्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच आमदार महोदयांना आपण शिवरायांच्या वेशात आहोत, याचे भान राहिले नाही. त्यांनी त्याच वेशामध्ये रामराजे नाईक-निंबाळकरांना मुजरा केला. रामराजे नाईक-निंबाळकरही त्यांना अभिवादन करत पुढे निघून गेले. मात्र गजभिये यांच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसला.
यापूर्वीची अशीच एक घटना आहे. नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्यानंतर अपत्य होतं असं विधान केलं होतं. या विधानाला निषेध करण्यासाठी प्रकाश गजभिये यांनी भिडेंच्याच वेशभूषेत आंदोलन केलं होतं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर मोठा आंबा घेऊन ते विधानभवनात आले होते.
अनेक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून अनेक जण येतात. मात्र छत्रपतींची वेशभूषा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे वागणे अपेक्षित असते. मात्र नेमकी इथेच गजभिये यांच्याकडून चूक झाली.

जलयुक्त शिवार योजनेत ‘हा’ जिल्हा प्रथम क्रमांकावर