महाजनादेश यात्रेदरम्यान दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच राहूल कुल यांना ‘मंत्रिपद’ देण्याचे दिले संकेत

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख )- दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना आता अशी जबाबदारी देणार आहे की त्यांना आम्हाला कामाच्या बाबत आता मागण्या  करण्याची गरज पडणार नाही तर त्या पूर्ण करण्याची धमक ही स्वतः त्यांच्यामध्येच असणार आहे असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड येथील सभेत देऊन पुन्हा एकदा दौंडकरांच्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवित केल्या असून जनतेनेही त्यांना मागच्यापेक्षा तिप्पट मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

ते  ‘महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वरवंड येथील ‛महासभेत’ बोलत होते. दौंड तालुक्यामध्ये आज शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, बाळा भेगडे, गिरीश महाजन, आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजनाताई कुल, कांचनताई कुल, प्रेमसुख कटारिया, नंदुभाऊ पवार, वासुदेव काळे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर,  नामदेव ताकवणे हे मान्यवर उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आपल्याला सभेला उशीर होण्याचे कारण देताना आपण रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांसोबत दिल्लीला जाऊन त्यांनी रात्री उशिरा आपल्या खासदार पदाचा राजीनामा देत आज सकाळी अमित शहा यांच्या उपास्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते सर्व उरकून पुन्हा येथे येण्यास त्यामुळे विलंब झाल्याचे सांगितले.

उपस्थित महाजनसमुदाय पाहून आता  राहुल दादांना प्रचार करायची  गरज उरली नाही असे वाटत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना त्यांनी आता राष्ट्रवादीचे सगळे पैलवान  चितपट झाले असून बारामतीमध्ये या यात्रेचे झालेले प्रचंड स्वागत पाहून बारामतीच्या नेत्यांनासुद्धा आज झोप येणार नाही. आम्ही कामे केली म्हणून जनता आमच्या सोबत आली मात्र आजही विरोधक ईव्हीएम बाबत हे प्रश्न उपस्थित करतात मग ज्यावेळी तुमचे सरकार होते तुमच्या  निवडणुका झाल्या त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.

ईव्हीएम बाबत बोलताना त्यांनी विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू पोरा सारखी झाली असून ईव्हीएम मध्ये बिघाड झाला नसून, बिघाड यांच्या खोपडीमध्ये झाला आहे अशी प्रखर टिका केली. सरकार बदलण्याबाबत  बोलताना त्यांनी आता २५ वर्ष यांना विरोधी पक्षातच राहावे लागेल कारण आता २५ वर्षे तरी यांना सत्ता मिळणार नाही असे म्हणत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ वर्षात ५० हजार कोटी आमच्या सरकारने दिले, यांनी १५ वर्षात २० हजार कोटी दिले हा फरक असल्याचे सांगितले. कारखाण्यावबाबत बोलताना त्यांनी राहुल दादांचा कारखाना अडचणीत आला त्यावेळी शासनाने त्यांना मदत केली कारण सहकाराचे कारखाने सहकाराच्या ताब्यात राहावेत, धनदांडग्याच्या ताब्यात जायला नकोत हे आमचे ध्येय होते असे म्हणत यापुढेही आम्ही मदत करत राहू असे आश्वासन दिले.

रस्ते, पाणी व विविध गरजा या सरकारने ध्यानात घेऊन मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध केला व बंद पडलेले प्रकल्पही सुरू केले असे सांगत टाटा व मुळशी चे पाणी दौंडला आणन्यायचे नियोजन लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले. शेवटी बोलताना त्यांनी १५  वर्षांमध्ये जी कामे होऊ शकली नाही ती कामे या सरकारच्या ५ वर्षांच्या काळात झाली असून ५ वर्षांत ११ लाख घरांची निर्मिती सुरू केली असून शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रोसेस सुरू झाली असून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येत असून २०२२ साला पर्यंत  एक ही कुटुंब बेघर राहणार नाही याची हमी त्यांनी दिली.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी बोलताना जानाई शिरसाई चे ८१ % पाण्याचे बिल शासन भरत असून यामुळे या योजनेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. अष्टविनायक मार्ग, क्रीडा संकुल, प्रांत कार्यालय यांमुळे दौंडला एक वेगळेच वैभव प्राप्त होणार असून सत्र न्यायालय दौंडमध्ये व्हावे यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला अल्पसंख्यांक निधी दिला असून हा निधी खूप मोठ्या प्रमाणात शासनाकडून उपलब्ध करण्यात येत असल्याचे नमूद केले. दौंड तालुक्यासाठी विविध स्वरूपाच्या मागण्या करताना त्यांनी कारखान्याला पुन्हा शासकीय मदत व्हावी ही अशी अपेक्षा व्यक्त करत वरवंड मधील पूल व साईड रोड, कुरकुंभ एमआयडीसी चा नागरिकांना होत असलेला त्रास कमी व्हावा व केमिकल विरहित एमआयडीसी व्हावी, पुणे दौंड लोकल सेवा सुरू व्हावी, पाण्याची टंचाई लक्षात घेता मुळशी धरणाचे पाणी या परिसरात वळवण्यात यावे अश्या विविध मागण्या केल्या.

तर शासनाच्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना याचा फायदा तालुक्यातील लोकांना होत असल्याचे सांगत प्रधान मंत्री आवास योजना, पीएमआरडीए ची कामे सुरू झाली असून कामगार कल्याण योजनेमुळे अनेकांना लाभ होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. या सभेसाठी संपूर्ण दौंड तालुक्यातून सुमारे ७५ हजारांच्या पुढे जनसमुदाय जमला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like