बडनेराचे आमदार आणि खासदार नवनीत राणा यांचे पती रवि राणा तापामुळे रुग्णालयात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. अशातच बडनेराचे आमदार रवि राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक ताप आला होता. शुक्रवारीही ताप कमी न झाल्याने शनिवारी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटपासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी त्यांना ताप आला. नवनीत राणा यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना याबाबतची माहिती दिली. प्राथमिक तपासणी करून डॉक्टर काकाणी यांनी आमदार रवि राणा यांच्यावर औषधोपचार सुरू केला. शनिवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. क्ष-किरण तपासणीसह विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून रवि राणा हे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत धान्य आणि किराणा वाटपासाठी शहरातील अनेक भागात फिरले होते.