रोहित पवारांनी पहिल्याच भाषणात उडवली भाजपची ‘खिल्ली’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून अनेक महत्वाच्या मुद्यांवरून, सत्ताधारी आणि विरोधकांतील वादामुळे हे अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. रोहित यांनी यावेळी भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच भाजपची खिल्ली उडवली. “विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावे अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे भाजप सैरभैर झाली आहे. राजकीय भाषणबाजीतच भाजपने आपला वेळ घालवला,” अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती, महिला, तरुणांचे प्रश्न, सरकारी नोकरीतील रिक्त पदे आदी प्रश्नांचा उल्लेख करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, सत्तेतील आमचा मित्र शिवसेनेला पुन्हा आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. तसेच विकासाच्या मुद्द्यावर बोलताना राजकीय पतंगबाजी टाळली पाहिजे, असेही मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.

पवार म्हणाले की, राज्याचा विकासदर घसरला आहे. पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य गेल्या पाच वर्षात 13 व्या क्रमांकावर गेले. गेल्या पाच वर्षांत ३-४ हजार कोटी खर्च करुन सुरु केलेले २२०० स्किल डेव्हलपमेंट सेंटर बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

रोहित पवार यांची ‘फेसबुक पोस्ट’
रोहित पवार यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्या भाषणानंतर फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. आजचा दिवस हा आपल्यासाठी आणि कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघासाठी एकूणच वेगळा दिवस होता, हे त्यांनी सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/