आमदार रोहित पवारांनी केले 1590 लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पुर्ण

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – कधी अपघातग्रस्तांना मदत तर कधी कार्यतत्परतेमुळे आमदार रोहित पवार नेहमीच चर्चेत असतात. आताही ते अशाच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील केंद्र शासनाचे अनुदान अद्यापही लाभार्थ्यांना मिळाले नाही. राज्यात सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे १५९० लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

जामखेड नगरपालिकेच्या क्षेत्रातील ९३३ घरकुल प्रकल्पांच्या उभारणीसाठी ११ कोटी १९ लाख ६० हजार, तर कर्जत नगरपंचायती अंतर्गत ६५७ घरकुल प्रकल्प उभारणीकरिता पहिल्या टप्प्याचे अनुदान तीन कोटी ९४ लाख २० हजार नगरपंचायतीच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेचे जामखेड नगरपालिकेतील ९३३ लाभार्थी आहेत. कर्जत नगरपंचायतीतील ६५७ लाभार्थ्यी आहेत. परंतु राज्य आणि केंद्राकडून अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम होता. त्याचबरोबर कोरोनामुळे अनुदान मिळणार नाही अशी चर्चाही रंगली होती. मात्र, याबाबत आमदार रोहित पवार यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार १९ नोव्हेंबरला प्रधान सचिव गृहनिर्माण विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला. हे थकीत अनुदान त्वरित वितरीत होणेबाबत प्रधान सचिव गृहनिर्माण यांनी तात्काळ दखल घेत संबंधित आवास योजनेचे कर्जत नगरपंचायत व जामखेड नगर परिषद हे प्रलंबित अनुदान वितरीत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.
त्यानुसार कर्जत नगरपंचायत येथील ६५७ घरकुल प्रकल्पांसाठी पहिल्या टप्प्याचे केंद्र शासन अनुदान मिळवून तीन कोटी ९४ लाख २० हजार इतके अनुदान कर्जत नगरपंचायतीच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले.

जामखेड नगर परिषद येथील एकूण ९३३ घरकुल प्रकल्पांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाचे अनुदान मिळवून ११ कोटी १९ लाख ६० हजार इतके अनुदान PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.