पवारांचा आदेश डावलणाऱ्या आ. जगताप कुटूंबातच उमेदवारीचा घाट ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपाला साथ देण्याचा आदेश दिलेल्या आ. संग्राम जगताप यांचे वडील आ. अरुण जगताप यांनाच राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आ. कर्डिले यांच्या संमतीशिवाय ते उमेदवारीचा प्रयत्न करतील, असे वाटत नाही. परिणामी महापौर पदाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करून भाजप उमेदवाराविरुद्ध आ. अरुण जगताप हे ‘डमी’ उमेदवार देण्याचा घाट तर नाही ना, असा संशय निर्माण होऊ लागला आहे. राजकीय वर्तुळात याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपापेक्षा जास्त संख्याबळ असूनही राष्ट्रवादीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलला होता. आ. जगताप कुटुंबियांच्या आदेशावरूनच हा निर्णय घेतला गेल्याचे उघड झाले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या घडामोडीनंतर नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या आमदारांना भाजपला पाठिंबा देऊ नका असे आदेश दिला होता, अशी कबुली जाहीरपणे दिली होती. ज्या आमदार जगताप यांनी पक्षप्रमुख पवार यांचा आदेश डावलून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्याच आमदार जगताप कुटुंबीयांच्या घरी उमेदवारी दिली तर ते खरंच प्रचार करणार की डमी उमेदवार राहून डॉ. सुजय विखे यांचे मार्ग मोकळा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यांना पवार यांचा आदेश पाळण्याची गरज वाटत नाही, त्यांना जर पवार यांनी उमेदवारी दिली तर ते लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांचा आदेश पाळणार का, असे राजकीय जाणकारांकडून विचारले जाऊ लागले आहे.

केडगाव हत्याकांडातून बचाव करण्यासाठी आ. जगताप कुटुंबियांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली होती. पक्षाने संबंधित सर्व नगरसेवकांची कालपट्टी केली होती. मात्र त्यांना आदेश देणार्‍या आ. संग्राम जगताप यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. त्यामुळे हा निव्वळ स्टंट असावा, असे बोलले जात होते. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अरुण जगताप, प्रशांत गडाख, अनुराधा नागवडे, निलेश लंके, प्राजक्ता तनपुरे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र लंके व तनपुरे हे स्पर्धेत टिकणे कठीण आहे. अनुराधा नागवडे या निवडणूक लढविण्यास आता इच्छुक नसल्याचे राजकीय गोटातून सांगितले जाऊ लागले आहे. मुळा एजुकेशन सोसायटीवरील संकट पाहता प्रशांत गडाख हे लोकसभेची उमेदवारी करण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. 1991 ची पुनरावृत्ती करण्यासाठी पवार यांच्याकडून गडाख यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या अनुषंगाने यशवंतराव गडाख व प्रशांत गडाख यांच्यासोबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची चर्चाही झाली. मात्र गडाख निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी सध्या आ. अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आले आहे. आ. अरुण जगताप हे भाजप आ. शिवाजी कर्डिले यांचे व्याही आहेत. ते दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी आ. जगताप हे आमदार शिवाजी कर्डिले यांचा आदेश पाळणार नाही, असे होऊ शकत नाही. महापालिकेत महापौर पदाच्या निवडीतून हे दिसून आले. शरद पवार यांच्यापेक्षाही त्यांना आ. कर्डिले यांचा आदेश महत्त्वाचा आहे. सुजय विखे यांच्याजवळ जिल्ह्यातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी फक्त आ. कर्डिले जवळचे आहेत. अलिकडच्या काही दिवसांपासून त्यांचे ऋणानुबंध वाढले आहेत. परिणामी डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी कर्डिले यांच्या सांगण्यावरून आ. अरुण जगताप हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागतील व निव्वळ ‘डमी’ उमेदवार म्हणून काम करतील, असे आता वाटू लागले आहे.

‘ही’ तर पवारांची राजकीय हतबलता

आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राजकीय हतबलता ठरेल. विखे यांना देण्यासाठी पवार यांनी लढवलेली खेळी त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे वाटू लागली आहेत. आ. अरुण जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास भारतीय जनता पक्षाकडून ‘मास्टरस्ट्रोक’ लावून आ. कर्डिले यांच्या माध्यमातून विखे हे शरद पवार यांना कोंडीत पकडून नगरची जागा काँग्रेसला न दिल्याचा वचपा काढतील, असे तज्ज्ञांकडून बोलले जाऊ लागले आहे.

…तर पक्षाचे मोठे अपयश

नगर लोकसभा निवडणुकीतील राजकीय चर्चा आता वेगळ्या वळणावर येऊ लागली आहे. पवार यांचा आदेश न जुमानणाऱ्या व्यक्तीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याची वेळ आली तर ते पक्षाचे मोठे अपयश असेल, असे बोलले जाऊ लागले आहे.

ह्याही बातम्या वाचा –  

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन 

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा 

मी बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन 

हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी