पुरंदर तालुक्यात अपंग भवन उभारणीसाठी पाठपुरावा करणार : आ. संजय जगताप

जेजुरी (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधवाना सर्व प्रकारचा शासकीय निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी खर्च करण्यात येईल. यासाठी स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करण्यात येईल. रेशन धान्य दुकानात दिव्यांगान धान्य वितरणात प्राधान्य देण्यात येईल. त्याच प्रमाणे तालुक्यातील दिव्यांग बांधवाना हक्काचा निवारा असावा यासाठी अपंग भवन उभारून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यात येईल अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कार्यालयात आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग निधी नियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सासवड आणि जेजुरी नगरपालिका यांच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग बांधवाना फिरते स्टोल उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी दिव्यांगानी मागणी प्रस्ताव द्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक, जेजुरीच्या मुख्याधिकारी पूनम शिंदे, प्रहार अपंग संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे, धर्मेंद्र सातव, समिती सदस्य संभाजी महामुनी, शिवाजी शिंदे, अमित झेंडे, रेखा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

समिती सदस्या आणि प्रहार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा सुरेखा ढवळे यांनी पंचायत समितीने शासन निर्णय २०१२ प्रमाणे कृती आराखडा तयार करून कार्यवाही करावी. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के निधी खर्च करावा. तसेच सासवड आणि जेजुरी नगर परिषदेने दिव्यांगाना निधी वाटप करावा, शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगाना येण्यासाठी राम्प तयार करावा अशी मागणी केली.

सासवड चे मुख्याधिकारी विनोद जळक आणि जेजुरीच्या मुख्याधिकारी पूनम शिंदे यांनी सध्या कोविड मुळे उत्पन्न कमी असल्याने निधी उपलब्ध करून तो डिसेंबर अखेर निधी खर्च करण्यात येईल असे सांगितले. तर गटविकास अधिकारी अमर माने यांनीही मार्च – एप्रिल २०२१ पर्यंत सर्व निधी खर्च करण्या बरोबरच वयक्तिक लाभ योजना पोचविण्यात येईल असे सांगितले. समिती सदस्य संभाजी महामुनी यांनी आभार मानले.