संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर रविवारी (दि.28 फेब्रुवारी) संजय राठोड यांनी आपल्या मत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विदर्भातून आमदार डॉ. संजय रायमूलकर आणि आशिष जयस्वाल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे बंजारा समाज नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार इंद्रनील नाईक यांच्या नावाची चर्चा रविवारी होती. इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत. त्यामुळे बंजारा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी इंद्रनील नाईक यांच्याकडे मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंद्रनील नाईक यांच्या नावासोबतच आता आमदार डॉ. संजय रायमूलकर आणि आशिष जयस्वाल यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आमदार रायमूलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा
विदर्भाचा विचार केला तर शिवसेनेचे चार आमदार निवडून आले आहेत. मागील सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागल्याने तीन टर्म आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. रायमूलकर यांनी 2009, 2014 आणि 2019 अशा तीन निवडणुकीत सलग चढत्या मताधिक्यानी विजयी होण्याचा विक्रम केला आहे.

मेहकर शिवसेनेचा गड
मेहकर हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार, अशी आशा व्यक्त होत होती. मात्र तीन पक्षांच्या सत्तेत मंत्रिपदाच्या जागा कमी वाट्याला आल्याने रायमूलकर यांना पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून नुकतीच जबाबदारी दिली आहे.

रायमूलकर अनुभवी असल्याचा दावा
विदर्भातील शिवसेनेच्या चार जागांचा विचार केला तर संजय राठोड आणि संजय रायमूलकर या दोघांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. तर नितीन देशमुख आणि संजय गायकवाड यांची पहिलीच टर्म आहे. तसेच भंडारा मतदारसंघातून मुळचे शिवसेनेचे असलेले आणि अपक्ष निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे सध्या जिल्हाध्यपदाचा कार्यभार आहे. या सर्वांचा विचार केला तर रायमूलकर हे अनुभवी असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्या विजयाच्या सातत्याची पक्ष प्रमुख दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.