शिवेंद्र राजे, संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडणार नाहीत, शरद पवार यांना ‘विश्‍वास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार शिवेंद्र राजे हे कालच मला भेटले असून श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले होते. तेसुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचे म्हणाले ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी रविवारी सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्र व राज्य सरकार ईडी, सीबीआय आणि अँटी करप्शनची भीती दाखवून पक्षांतर घडवून आणत आहेत. त्यामुळेच चित्रा वाघ, कल्याण काळे हे पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याचा दावा त्यांनी केला. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबतच होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे मला भेटायला येणार असल्याचा खुलासा पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याने ते पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजप त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणुक लढविण्यासाठी दबाव टाकत आहे. हसन मुश्रीफ यांनी नकार देताच त्यांच्या घरावर प्राप्तीकर विभागामार्फत छापा टाकला. त्यांना हात हलवत परत जावे लागल्याची आपल्याला समजले. सत्ताधारी भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत सापडल्यानंतर सरकारने नियम मोडून त्यांना मदत केली. त्यामुळे त्यांना भाजपामध्ये जावे लागले. चित्रा वाघ या दोन दिवसांपूर्वी मला भेटल्या होत्या. त्यांच्या पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना काहीही मदत करु शकत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत समर्थन केले. छगन भुजबळ यांच्यावरही खटला भरला असून त्यांना तुरुंगातही डांबले होते. त्यांच्यावर झोपडपट्टीच्या जागेवर टीडीआर देऊन त्याऐवजी महाराष्ट्र सदन बांधून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. दिल्लीतील सर्वात सुंदर भवन म्हणून महाराष्ट्र सदन ओळखले जाते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही त्याच महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करावा न लागता इतके सुंदर सदन बांधलेल्या छगन भुजबळ यांना या सरकारने तुरुंगात टाकले अशी टिका पवार यांनी केली.