शिवेंद्रराजेंची भाजप उमेदवारासोबत ‘मिसळ पे चर्चा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण आले असताना उजयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजेंनी भाजपचे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केल्याने साताराऱ्यात उलट सुटल चर्चाचा फड रंगात आला आहे. शिवेंद्र आणि नरेंद्र यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी मिसळवर ताव मारला. या भेटी दरम्यान कोणती चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

साताऱ्यात उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिवेंद्रराजेंनी बारामतीत जाऊन शरद पवार यांना केली होती. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला हि शिवेंद्रराजे गैरहजर होते. तर शिवेंद्रराजे यांनी नरेंद्र पाटील यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या आणि उदयनराजेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात गाठीभेटीचे सत्र सुरु केले आहे. आज त्यांनी साताऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सकाळी भेट घेतली. त्यावेळी तेथे शिवेंद्रराजे हि दाखल झाले. गप्पा सुरु असताना मिसळचा विषय निघाला तेव्हा शिवेंद्रराजेंच्या गाडीत बसूनच नरेंद्र पाटील साताऱ्यातील प्रसिद्ध चंद्रविलास हॉटेलमध्ये मिसळ खाण्यास गेले. शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित नराहता भाजपच्या उमेदवाराच्या सोबत मिसळ खाण्यास गेल्याने अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या प्रसंगी पत्रकारांना उत्तर देताना, सध्या माझे काम टेन्शन घ्यायचे नाही तर टेन्शन द्यायचे आहे. नरेंद्र पाटील यांच्या सोबत खाल्लेली आजची मिसळ नक्कीच गोड होती असे शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. मात्र शिवेंद्र-नरेंद्र यांच्या मिसळीचा आस्वाद राजकीय पटलावर खळबळ माजवणारा आहे.