Pune News : ‘होर्डिंग नेतृत्व’ आश्वासक नाही, देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडे ‘होर्डिंग नेतृत्व’ हा नवीन प्रकार आला आहे. काल-परवापर्यंत कोणालाही माहिती नसलेली मुले स्वत:च्या नावाचे होर्डिंग लावून अमुक एक दादा, तमुक एक दादा होतो. मात्र, असे नेतृत्व आश्वासक होऊ शकत नाही, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाश शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. शिवाजीनगर मतदार संघात नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘अटलवार्ता’ या नियतकालिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आव्हानांच्या काळात जे उभे राहते, तेच खरे नेतृत्व असते आणि खऱ्या नेतृत्वाची कसोटीही तेथेच लागते, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी हा सेवक असतो. त्याने जनतेला उत्तदायी असलेच पाहिजे. याच भावनेतून वर्ष संपले की, आपल्या कामाचा हिशोब देणे ही भाजपची परंपरा होती आणि आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी या परंपरेला साजेस काम केले आहे. लोकप्रतिनिधी हा समाजात, जनतेमध्ये फिरणारा असावा. त्यामुळे त्याची प्रगल्भता, प्रश्नांची जाण वाढते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, कामाचा अहवाल देणे ही रामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिलेली आदर्श परंपरा आहे. आपण काय केले आहे आणि काय करायचे राहिले, हे आपल्याला आणि जनतेला अहवालामुळे समजते. शोधक वृत्ती, वैचारिक बैठक, समाजासाठी काम करण्याची निष्ठा आणि कामासाठी पाठपुरावा करणे हे गुण शिरोळे यांच्या दिसतात, असे पाटील यांनी म्हटले.