आमदार विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचं निधन

वारणानगर : पोलीसनामा ऑनलाईन – वारणानगर येथील वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे या गेल्या काही दिवस आजारी होत्या. सोलापूरमधील कन्या व जावयाच्या हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

वारणा समूहाचे संस्थापक वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा दिवंगत सावित्रीआक्का विश्वनाथ तथा तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा समर्थपणे शोभाताई कोरे यांनी चालवत सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात आदर्श कार्य केले. महिला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वांना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात आईसाहेब या नावानं सर्वत्र परिचित होत्या.

9 ऑक्टोबर 1942 साली त्यांचा जन्म सिद्धेश्वर कोरोली (ता खटाव) येथील कुटुंबात झाला. 1942 हे क्रांती वर्ष आहे. यावर्षीच इंग्रजांना भारतातून चलेजाव घोषणा करण्यात आली. त्या काळात मुली शाळेत जात नव्हत्या. त्यावेळी त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीची एम ए पदवी संपादन केली. त्यांचा विवाह सहकार महर्षी दिवंगत तात्यासाहेबर कोरे यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत विलासराव कोरे यांच्याशी झाला होता. घरात सहकाराची पेरणी, त्यामुळं त्यांचा वेळ कार्यकर्ते व पै-पाहुणे गोतावळा यांच्या पाहुणचारात जात असे. त्यांच्यावर सहकाराची कोणतीही जबाबदारी नव्हती.

त्यांनी 1993 साली सर्वाधिक महिला सभासद असणाऱ्या वारणा बझार या संस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी घेतली आणि त्यांचं कर्तृत्व पाहायला मिळालं. बझारचा विस्तार झपाट्यानं झाला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावात शाखा सुरू झाल्या. त्यानंतर वर्षभरानंतर 1994 ला वारणा भगिनी मंडळांची सूत्रं हाती घेतली. त्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांमध्ये चैतन्य आलं आणि गरजू व निराधार महिलांचं भाग्य उजळलं. महिलांच्या हाताला काम मिळालं. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उत्पादन करून विक्रीस जाऊ लागले. आज या पदार्थांची विक्री कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. सावित्रीआक्का कोरे यांच्या निधनानंतर त्यांनी वारणा सहकारी साखर कारखान्याची धुरा यशस्वीपणे आजअखेर सांभाळली.

वारणा बँकेचे चेअरमन निपून कोरे, आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत्या. शोभाताई कोरे यांच्या निधनानं वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.