पंकजा मुंडेंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात ? विनायक मेटे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली. हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे स्वपक्षीयांचा हात आहे अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक मेटे म्हणाले की, ‘पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजप नेते किंवा पदाधिकारी यांचा संबंध नाही. या चर्चेत तथ्य नाही. पराभवाची कारण जे पराभूत झाले ते शोधतील. मात्र, बीड जिल्ह्यापुरते उदाहरण घेतले तर असा कोणता बाहेरचा नेता आहे की ज्याचे इथे पन्नास-शंभर कार्यकर्ते आहेत. त्यांनी विरोधात काम केले, असे तरी निदर्शनास आले नाही.’

बीडमध्ये स्थानिक पातळीवर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर आजही कायम आहे. भाजप सरकारचा घटक पक्ष असलेला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आणि पंकजा मुंडे यांच्यात कायमच दुरावा राहिलेला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष होता. त्यावेळी त्यांनी बीडमधून विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामने राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्याने या दोघातील संघर्ष अधिकच वाढला.

Visit : Policenama.com

You might also like