धक्कादायक ! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक वादामुळे एका आमदाराच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. वाहतूक पोलीसाने शनिवारी (दि. 22) सकाळी एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखल. त्यावेळी तिची चौकशी केली असता संबधित महिला ही आमदाराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचे नियोजन करत असताना एका दुचाकी चालकाने एक महिला ब्रीजवर चढली असून रडत असल्याची माहिती दिली. यानंतर कॉन्स्टेबल ढगे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस ठाणे, नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली. कॉन्स्टेबल ढगे यांनी घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन महिलेसोबत चर्चा करून त्यांना खाली उतरवत आत्महत्येपासून रोखल. त्यानंतर महिलेला मानखुर्द पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याठिकाणी महिलेने आपण आमदाराची पत्नी असल्याची माहिती दिली. कौटुंबिक वादामुळे आपण तणावात होतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. महिलेला नंतर नवी मुंबई पोलिसांकडे सोपण्यात आले. त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधत सर्व घटनाक्रम सांगितला.