रस्ता दुभाजक फोडल्याने आमदारांनी व्यक्त केली नाराजी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्यातील वाघोलीच्या विकासात भर घालण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून अकरा कोटी रुपये निधी खर्च करून वाघोलीतील वाघेश्वर मंदिर ते श्रेयस गार्डन पर्यन्त रस्ता रुंदीकरणाचे आणि रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे.तर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता दुभाजकाच्या मध्ये जागोजागी पंच्चर देखील ठेवण्यात आले आहेत.

परंतु वाघोली येथील फडई चौक ते शिवाजी पुतळा दरम्यान एका ठिकाणी रात्रीच्या सुमारास कोणी अज्ञातांकडून रस्ता दुभाजक फोडण्यात आला आहे. यामुळे वाघोलीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याच दरम्यान आमदार पवार हे वाघोलीत एका कार्यक्रमात आले असता त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली गेली असता यावर नाराजी व्यक्त करत आमदार म्हणाले, जी विकासाची कामे झालेली आहेत त्या कामाबाबत कोणी खोडसाळपणा करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.

यामध्ये तो माझा कार्यकर्ता असेल किंव्हा माझ्या नावाचा वापर करत असेल त्याचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी कार्यकर्त्याना दिला आहे. तर याबाबत संबंधित ठेकेदाराला फोडलेला रस्ता दुभाजक तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश देखील दिले तर राहिलेले काम देखील तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या फूटपाथचे गट्टू अनेक ठिकाणी निखळून पडल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी कामे देखील अपूर्ण असल्याचे दिसत आहे. याकडे मात्र पीएमआरडीएचे दुर्लक्ष असल्याचा आरोप वाघोलीतील नागरिक करत आहेत