सुप्रिया सुळेंच्या बनावट Audio क्लिपमुळं खळबळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून, उद्या यासाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये विविध पक्ष आपापल्या परीने आयडिया करून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातदेखील अशाच पद्धतीचा एक प्रकार समोर आला असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या आवाजातील एक बनावट ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हच्या (Facebook Live) माध्यमातून तात्काळ याबाबत खुलासा केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाआघाडीच्या वतीने सतीश चव्हाण निवडणूक लढवत आहेत; परंतु त्यांच्याविरोधात सुप्रिया सुळे या प्रचार करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर एक फेक मोबाईल क्रमांकदेखील फिरत आहे.

परंतु यासंदर्भात सुळेंनी खुलासा केला असून, विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून याविषयी खुलासा केला असून, ‘मला माझ्या काही सहकाऱ्यांचे तसेच, वर्तमानपत्र व चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या नावाचा, आवाजाचा आणि खोटा मोबाइल नंबर वापरून व लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात इतकी पातळी सोडून विरोधक प्रचार करत आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो रडीचा डाव खेळत आहेत, त्याची कल्पना मी सतीश चव्हाण यांना दिली आहे, असे सुळे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पदवीधरची ही निवडणूक आहे. कुठलाही विषय राहिला नसल्यामुळं विरोधक पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून, बनावट अकाउंट, बनावट नंबर वापरून आज ते प्रचार करत आहेत. मी या प्रकाराचा निषेध करते. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. इथे हा रडीचा डाव खेळणं चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. मला कोणावरही आरोप करायचा नाही. पण तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणं चुकीचं आहे. तुमच्याकडं बोलण्यासारखं काही नसेल तर बोलू नका. गप्प राहा. या प्रकरणी गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.. त्याचबरोबर अशा पद्धतीने रडीचा डाव खेळून विरोधकांना यश मिळणार नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.