भाजप नेते गोपीचंद पडळकरांची उपमुख्यमंत्र्यावर जहरी टीका; म्हणाले – ‘अजित पवारांचे बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून राष्ट्रावादी आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दीक द्वंद थांबण्याचे नाव घेत नाही. काल अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केल्यानंतर आज पडळकर यांनी त्या टीकेचा खरपूस समाचार घेत अजित पवारांवर जहरी टीका केली. अजित पवारांचे बोलणे टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे, अशा शब्दात पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रसारासाठी गोपीचंद पडळकर हे पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज मंगळवेढा येथे जाहीर सभा घेत महाविकास आघाडी सरकार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी समाधान अवताडे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

दरम्यान, काल (8 एप्रिल) अजित पवार यांनी कासेगाव येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषण करत फिरतोय, त्याच डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आले नाही आणि आता हा कोणाच्या तोंडाने मतं मागतोय ? ज्याला स्वत: चे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय, असे म्हणत अजित पवारांनी पडळकर यांची खिल्ली उडवली होती.

अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी जहरी टीका केली आहे. ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचे रडणे जगाने पाहिले. चुलता हेच त्यांचे भांडवल असल्याचे अजित पवार यांनी कबूल करताना त्यांचे कर्तव्य शून्य असल्याचे दाखवून दिले, असा टोला पडळकरांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आज उपमुख्यमंत्र्यांना गल्ली बोळात दारोदार फिरण्याची वेळ का आली आहे. मी आटपाडीतून येऊन बारामतीत उभा राहिलो आणि डिपॉझिट गेले. पण अजित पवार यांच्या पोराचा अडीच लाखाने पराभव का झाला याचे उत्तर त्यांनी द्यावे ?असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.