MMRDA  नं मोनो रेलसाठी चीनी कंपनीसोबतचा करार केला रद्द, भारतीय कंपन्या बनवतील ‘रॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील नामांकित कंपन्यादेखील भारतीयांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्यात सरकारी विभागही मागे नाहीत. आता मोनो रेलने आपले १० रॅक तयार करण्याचा चीनी कंपनीबरोबरचा करार रद्द केला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आरए राजीव म्हणाले की, रद्द केलेल्या कराराअंतर्गत काम करण्यासाठी भारतीय कंपन्यांशी करार केला जाईल.

एमएमआरडीएचे आयुक्त आरए राजीव पुढे म्हणाले की, चिनी कंपनीबरोबरचा करार गेल्या महिन्यातच रद्द करण्यात आला आहे. आता मोनो रेलसाठी कोच, उत्पादन, पुरवठा आणि चाचणीसाठीचे ५०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी तीन भारतीय कंपन्यांनी आपला रस दाखवला आहे.

यापूर्वी बिल्ड युअर ड्रीम आणि चाइना रेलरोड कॉर्पोरेशन या दोन चिनी कंपन्यांना हा करार देण्यात आला होता. भारत-चीन सीमा वादामुळे आता ही निविदा रद्द करून पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमएमआरडीएने १० वर्षांच्या कामाचा अनुभव आणि उत्पादन क्षमता असलेल्या कंपन्यांना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, मोनो रेलचे रॅक बनवण्यासाठी मेट्रो प्रोजेक्टसाठी मेक इन इंडिया अंतर्गत कोच बनवणाऱ्या भारत अर्थ मूव्हर्स (बीईएमएल) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) या कंपन्यांनी रस दाखवला असून त्यांच्यासह चर्चा देखील सुरू झाली आहे. याशिवाय टीटागढ़ वॅगन्स नावाच्या भारतीय कंपनीनेही मोनो रेलचे कोच बनवण्यात रस दाखवला आहे. त्यांच्या क्षमतेचा आढावा घेऊन लवकरच हा प्रकल्प राबवला जाईल, असे एमएमआरडीएने सांगितले.