MMRDA चा दावा ! मुंबईत चालकविरहीत Metro ऑक्टाेबरमध्ये धावणार, कमाल वेग मर्यादा 80 किमी प्रति तास राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मेट्रोच्या लाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही मेट्रो लाईन येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील, असा दावा MMRDA ने केला आहे. या मेट्राेचे वैशिष्ट्य म्हणजे ती चालकविरहित राहणार आहे. या मेट्रोची कमाल वेग मर्यादा 80 किमी प्रति तास राहणार आहे. या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील 13 लाख प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मेट्रोच्या कामात अडचणी येत आहेत. कामगार कमी आहेत. मात्र याचा कामावर परिणाम झालेला नाही. 2016 साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. 5 वर्षांत ते पूर्ण होत आहे. मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे. 2016 पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: 2031 पर्यंत 1 कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक डब्यात वातानुकूलित यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे असलेल्या मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन 6 कोचची आहे. कोचमध्ये 52 प्रवाशांची बसण्याची तसेच 328 प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात 380 जणांना प्रवास करता येणार आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता 2280 आहे. मेट्रो कोच एसी असून दरवाजे स्वयंचलित आहेत. प्रवाशांच्या मदतीला डब्यात स्विच असून ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य दिले आहे.