ग्रामपंचायत निवडणुकांमधून ‘मनसे’ सक्रीय !

पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप यांचे राजकारण, त्यांचे कार्यक्रम याचाच बोलबाला फार सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून सामना रंगलेला आहे. अशा या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (Mns) ‘स्टेडी अँड शुअर ‘अशा पद्धतीने सक्रीय झाली आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीतून मनसेच्या (Mns) इंजिनाला किती इंधन मिळेल याचा अंदाज येईल.

राज्यात चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकांसाठी मनसेने अनेक ग्रामपंचायतींमध्ये पॅनेल उभी केली होती. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, छोट्या महापालिका, मोठ्या महापालिका अशा सगळ्या निवडणुका लढवत, लढवत पक्ष पुढे जाईल असे या पक्षाच्या नेत्यांनी नुकतेच स्पष्ट केले. या निवडणुकांच्या निमित्ताने पक्षाच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नागरी प्रश्नांचा आणि राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे असे मनसेच्या नेत्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आघाडी करुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकारचा एक वर्षाचा काळ नुकताच पूर्ण झाला. महाराष्ट्रातील सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवतील अशा घोषणा सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आघाडीतील सर्वच पक्षांकडून करण्यात आल्या. ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर झाल्यावर मात्र आघाडीच्या एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या घोषणा हवेत विरल्या.

आघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधातच उभे ठाकले. केवळ ग्रामपंचायत च नव्हे तर, महापालिकांमध्येही स्वतंत्र लढण्याची त्यांची भाषा सुरु आहे. अशा या परिस्थितीत मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका लढण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने त्यांची व्यूहरचना आखली जात आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भाजपही उठवू पहात आहे आणि भाजपने मनसेविषयी अतिशय सावध भूमिका घेतलेली आहे.

वर्षभराने होणारी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. भाजपने तिथे सेनेपुढे मोठे आव्हान उभे केलेले आहे. अशा चुरशीच्या वेळी मनसेची भूमिका निर्णायक ठरू शकते. याचा अंदाज भाजपला आला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष मनसेच्या विरुद्ध कोणतीच भूमिका घेणार नाही, कदाचित प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळतेजुळतेच घेईल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तसेच येत्या महिन्याभरात मुंबई लगतच्या कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि नवी मुंबई या तीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या तीन महापालिकांच्या निवडणुका म्हणजे मुंबई महापालिकेसाठीची रंगीत तालीम मानल्या जातात. तिथेही मनसेची भूमिका महत्त्वाची आहे. नाशिक महापालिकेत सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे प्रयत्न चालू असून, महापौर शिवसेनेचाच अशी घोषणाही शिवसेनेनी केली आहे. तर, या महापालिकेवर पुन्हा प्रभुत्व मिळविण्यासाठी मनसेही कामाला लागली आहे.

पुणे, मुंबई, नाशिक हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला त्रिकोणी पट्टा महापालिकेच्या निवडणुकांमुळे वर्ष-सव्वावर्ष गाजणार आहे आणि भाजप, शिवसेना, मनसे या तिघांनाही तिथे सत्ता मिळवायची आहे.