मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ‘मनसे’ कार्यकर्त्यांला अटक, पोलिसांची भिती दाखवून उकळत होता खंडणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाच्या गुन्ह्यातील मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याचे जाणून पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी त्यांना पैसे देऊ केले. तेव्हा नातेवाईकांचा त्यावर विश्वास बसेना, ते पैसे घेण्यास नकार देऊ लागले. तेव्हा पोलिसांनी चौकशी केल्यावर राजकीय कार्यकर्ते म्हणविणारे कसे पोलिसांच्या नावावर मृताच्या टाळूवरील लोणी खातात, याचा प्रत्यय समोर आला. यावरुन एक खंडणीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनसे उपाध्यक्ष संतोष गोविंद साठे असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी, मुंबईतील आर सी एफ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी एका खुनाच्या गुन्ह्यात मृताच्या भावाला अटक केली होती. तेव्हा मनसेचा उपाध्यक्ष संतोष साठे याने अटक केलेल्या आरोपींच्या नातेवाईकांशी संपर्क केला व पोलीस आरोपीला मारहाण करतील, अशी भिती दाखविली व पोलिसांना पैसे देण्यासाठी त्यांना राहते घर विकून पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या नातेवाईक दीपक मारुतराव आखाडे यांनी नागपूरहून साठे याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर ५० हजार रुपये पाठविले.

इकडे या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी मृताच्या वडिलांची गरीबीची परिस्थिती पाहून त्यांना मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ३ हजार रुपये देऊ लागले. तेव्हा पोलीसच पैसे देत असल्याचे पाहून त्यांना आर्श्चय वाटू लागले. पोलीसच पैसे देत असताना केवळ मारहाण करु नये, म्हणून तेच पोलीस पैसे कसे घेतील, असा संशय त्यांना आला. त्यांनी साठे याला जाऊन विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना खात्री वाटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे त्याची माहिती दिली.
त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन साठे याला अटक केली आहे.

याबाबत जितेंद्र सोनवणे यांनी पोलीसनामा ला सांगितले की, खुनाच्या गुन्ह्यात भाऊच आरोपी आहे. त्याच्या वडिलांची गरीबीची परिस्थिती पाहून आपण त्यांना अंत्यसंस्कारासाठी ३ हजार रुपये देऊ करत होतो. पोलीसच पैसे देतात, मग ते पैसे कशाला मागतील असा संशय त्यांना आला. पोलिसांच्या नावावर खंडणीचा हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पैसे देऊ केल्यामुळे हे उघडकीस आले असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात राबता असतो़.अनेकदा ते वेगवेगळ्या प्रकरणात मांडवली करतात व त्यातून दोन्ही गटाकडून पैसे उकळतात. पण आपल्या मुलावर अंत्यसंस्कारासाठी ज्याच्याकडे पैसे नाहीत, त्यांना पोलिसांची भिती दाखवून अक्षरश लुटण्याचा प्रकार होत होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/