आरोग्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा : मनसे आक्रमक

नवी मुंबई :  ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 1 लाख 20 हजार कोरानाबाधितांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केल्याचे विधान नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्षेप घेत आरोग्यमंत्री टोपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा मागणी केली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोनारुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते. अशा रुणांची संंख्या 1 ते 2 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. याबाबत रुग्णालयांमध्ये तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईनवरही संपर्क केल्यास हीच माहिती मिळते, असे अनेक अनुभव जनतेला आहेत.

मग महाराष्ट्रत 1 लाख 64 हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना 1 लाख 20 हजार या योजनेतून कसा काय लाभ मिळू शकतो, असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजेश टोपे खोटे बोलत आहेत. एकतर त्यांनी या 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा राज्यातील जनतेची माफी मागून मंत्रिपदावर असताना आपण खोटे बोललो म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने केली.