दौंड शहरामधील रस्त्यांची कामे रेंगाळल्याने मनसेचे आंदोलन

कामे पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या पाच महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा त्रास सहन करणाऱ्या दौंड शहरातील नागरिकांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवल्यानंतर आता राजकीय पक्षांनीही यामध्ये उडी घेतल्याने दौंड शहरामधील वातावरणही आता चांगलेच तापताना दिसत आहे. रस्त्यांच्या रेंगाळलेळ्या कामांवरून आता मनसे ही आक्रमक झाली असून शहरातील रस्त्यांची कामे त्वरित व्हावी यासाठी शुक्रवारी दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड शहरामध्ये आंदोलन केले. या आंदोलनानंतर रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात आली नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून दौंड शहरामध्ये मुख्य चौकांमध्ये असणाऱ्या रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून ही कामे संथ गतीने सुरू असल्याने येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. मुख्य चौकांमधील ही कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी आता जोर धरत आहे.