मुंबई पोलिसांबद्दल काही बरळलेलं सहन करणार नाही, मनसेची कंगनाला तंबी

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना रणौतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही कंगनाच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे. यावर आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही प्रतिक्रिया दिली असून, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असे म्हटले आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट केले असून, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असोकशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेलले मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही. असे ट्वीट केले आहे.