उध्दव ठाकरे अद्यापही पक्षप्रमुख असल्यासारखेच वागतात, मनसेचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तास्थापनेत मनसेच्या बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही पक्षप्रमुखासारखेच वागत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांच्याकडे मनसेच्या बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच मनसेने एक निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात दिले, तेच निवेदन घेवून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सुभाष देसाई यांची भेट घेतली. मात्र मनसेच्या शिष्टमंडळाला डावलण्यात आलं. असा आरोप मनसेकडून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ 1 जागा जिंकता आली. सत्तास्थापनेच्या नाटकात मनसे कुठेच दिसली नाही. सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सत्तास्थापनेनंतर मनसे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस,उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.