मनसेचे बाबाराजे जाधवराव यांच्या हाती कमळ, कोथरूड येथील मेळाव्यात भाजपमध्ये केला प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी आता रेल्वे इंजिनला बाय-बाय करीत हातात कमळ घेतले आहे. लोकसभा निवडणूकीच्यावेळीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्‍त सर्वप्रथम पोलीसनामा ऑनलाइनने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले असून त्यांनी आज (बुधवार) कोथरूड येथील आशिष गार्डन येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत प्रवेश केला आहे.

जाधवराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील राजकीय चित्र भविष्यात बदलु शकते. जाधवराव यांचे वडील दादा जाधवराव यांनी पंचवीस वर्षाहुन अधिक काळ तालुक्यात सत्ता आणि वर्चस्व ठेवले होते. त्यांचे वारस असलेले बाबाराजे हे सध्या मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

मनसेचे नेते बाबराजे जाधवराव, जिल्हा अध्यक्ष संदीप सातव, गंगाराम जगदाळे, रवींद्र फुले, रमेश मोकाशी, जालिंदर जगताप, गुलाबराव झेंडे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड येथील आशिष गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, शिवसेना नेते शशिकांत सुतार, महापौर मुक्ता टिळक, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दीपक पोटे, रिपाइं च्या संगीता आठवलेशिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार हे व्यासपीठावर उपस्थित होते.  शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांच्यासह भाजपचे काही नगरसेवकांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली.

Visit : Policenama.com