महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय; राज ठाकरेंनी केले रणजितसिंह डिसले यांचे कौतुक अन् अभिनंदन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय, असे ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष ठाकरे यांनीही डिसले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची किंमत 7 कोटी रुपये इतकी आहे. जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड झाली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती रणजितसिंह डिसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे 9 देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरिता वापरणार आहेत.