राज ठाकरेंचा ‘आंध्र पॅटर्न’ ; विधानसभा निवडणुक ‘स्वबळावर’ लढवणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि पक्षांना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून महाआघाडीच्या नेत्यांपुढे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटना या पराभवानंतर विविध पर्यायांची चाचपणी करत आहेत.

या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपले उमेदवार न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले होते. राज्यभरात १० मोठ्या सभा घेऊन त्यांनी महायुतीला मतदान न करण्याचे मतदारांना आवाहन केले होते. मात्र या प्रचाराचा त्यांना मतदानात फायदा झालेला दिसून आले नाही. त्यामुळे या विधानसभेला राज ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीमध्ये देखील त्यांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सगळ्यात राज ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून राज ठाकरे हे वायएसआर काँग्रेसचे अनुकरण करतील, असे वृत्त आहे. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांनी देखील कुणालाही बरोबर न घेता स्वबळावर निवडणूक लढवून राज्यातील १७५ पैकी १५२ जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान, तसाच प्रयोग राज ठाकरे यावेळी महाराष्ट्र्रात करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. महाआघाडी राज्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २५ ते ३० जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र राज ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असल्याचे समजत आहे. राज्यात सरकारविरोधात लाट असली तरी विरोधी पक्ष म्हणून एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम राज ठाकरेच करु शकतात, असा दावा मनसेमधील अनेक नेत्यांनी केला आहे.