राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘कॉल’, सांगितला महत्वाचा ‘हा’ मुद्दा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोरोना आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेल. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळे आठवड्यातून एकदा केंद्र व सर्व राज्य सरकारांनी त्याबाबतचं एक ‘न्यूज बुलेटिन’ काढावं, अशी महत्वाची सूचना राज ठाकरे यांनी सरकारला दिली.

राज्यामध्ये कोरोनाचा लढा सुरु झाल्यापासून राज ठाकरे हे सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात आहे. तसेच ते सरकारला वेळोवेळी सूचना देखील करत आहे. बुधवारी राज यांनी मुख्यमंत्र्याना बोलून काही गोष्टी निदर्शनास आणल्या. ट्विटर वर पत्रक टाकून त्यांनी याबाबत माहिती दिली. “कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे.

कल्याणमधील तर ६ महिन्यांची मुलगी बरी होऊन घरी आली, तिच्यासारखे हजारो जण कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहे. पण ह्या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. जर ती मिळाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल व सातत्याने भीतीच्या सावटाखाली असणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. किंबहुना ३ मे पर्यंत लोक लॉकडाऊनच पालन करतील ह्याविषयी शंका नाही असं राज यांनी म्हटलं आहे.

… तर अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील !

कोरोना संसर्गाच्या नुसत्या संशयावरून व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहे. हा प्रकार चुकीचा असून सर्वांसाठीच नुकसानकारक ठरेल. ह्या संसर्गाच्या नुसत्या शंकेने जर एखाद्याला वाळीत टाकण्याचे प्रकार होत असतील तर लोकांचा कल त्यांची लक्षण लपवण्याकडे जास्त राहील आणि पर्यायाने लॉकडाऊन सकट केलेल्या अनेक योजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे मान्य आहे पण टी.बी सारखे अनेक दुर्धर आजार संसर्गजन्य असतानाही आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही, मग आताच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावरती उपाय म्हणून कोरोनातुन मुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी देणार ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा जारी केलं जावं. माध्यमांनी देखील ह्या मुद्याचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहचवावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.