राज ठाकरेंनी काढला फोटो अन् सफाई कर्मचार्‍यांचा आनंद द्विगुणीत झाला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray) अनेकदा चर्चेत राहिले. अनेक जणांचे शिष्टमंडळ त्यांच्या मागण्या घेऊन राज ठाकरेंकडे गेले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मागण्या घेऊन गेल्यानंतर काही दिवसांनंतर त्या शिष्टमंडळांचे प्रश्न मार्गीदेखील लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज यांचा टेनिस कोर्टवरील पुत्र अमित समवेतचा एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर आता राज यांच्या आणखी एका फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

राज ठाकरे शिवाजी पार्कवर टेनिस खेळायला गेल्यानंतर मुंबई महापालिकेचे सफाई कामगार (Cleaning worker) त्यांच्याकडे आले. त्यांनी राज यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. राज यांनी त्यांच्या विनंतीला मान देत सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.

गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकजण कृष्णकुंजवर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवर निर्बंध आणले होते. त्याचा फटका लाखो लोकांना बसला. या काळात अनेकांनी कृष्णकुंजवर येऊन त्यांची गाऱ्हाणी राज यांच्याकडे मांडली. वारकरी, कोळी बांधव, ब्रास बँड पथक, आयटीआय शिक्षक, ग्रंथालय कर्मचारी, डबेवाल्यांनी राज यांच्याकडे त्यांच्या समस्या मांडल्या. राज यांनी गेल्या महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी वाढीव वीजबिल आणि दूध दराचा मुद्दा उपस्थित केला होता.