मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – अंबानीच्या घराजवळ बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पध्दतीने होणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करावी. मग कशी राज्यात फटाक्यांची माळ लागते ते पाहा. कुणाकुणाची नाव बाहेर येतील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Anil Deshmukh should resign immediately. The main issue is that of an explosive-laden vehicle being found near the residence of an industrialist. I request the Central Government to intervene. The State government cannot investigate this matter: MNS chief Raj Thackeray pic.twitter.com/gNN0Segeqt
— ANI (@ANI) March 21, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या सनसनाटी आरोपानंतर राज ठाकरे यांनी रविवारी (दि. 21) पत्रकार घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. परमबीर सिंगांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र अतिशय गंभीर आहे. पण मूळ प्रश्न अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे यामागचे खरे हात वेगळेच आहेत. फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंनी वाझेला पुन्हा सेवेत घेण्याची वारंवार मागणी केली होती, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हणजे वाझे हा व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटत तितके सोपे नाही. गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचं टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. मुंबईसाठी जर देशमुखांनी 100 कोटीचे टार्गेट दिले होते, तर मग इतर शहरात काय परिस्थिती असेल, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात जर सचिन वाझेचा हात होता. मग परमबीर सिंग यांची बदली का केली गेली? आणि जर परमबीर सिंगही यात सामील असतील मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली गेली? या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.