‘पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे…’, राज ठाकरेंकडून ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   लॉकडाऊनमुळं सारं काही बंद होतं. आता हळूहळू सर्व सुरू होत आहे. अशात लॉकडाऊनच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ काशीनाथ घाणेकर हा सिनेमा पाहिला आहे. यानंतर त्यांनी ट्विट करत आपल्या भावनाही मांडल्या आहेत. यात त्यांनी पुन्हा मराठी रंगभूमी बहरू दे असं म्हटलं आहे. एक सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी सोशलवर शेअर केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे लिहितात, “डॉ काशीनाथ घाणेकर हा सिनेमा जरी 2018 मध्ये रिलीज झालेला असला तरीही माझा पाहायचा राहून गेला होता. बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यानं बाहेर पडणं शक्यच नाही. त्यामुळं नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमा पाहताना हा सिनेमा समोर आला आणि मी एका बैठकीत तो बघून संपवला.”

पुढे राज ठाकरे म्हणतात, “एका शब्दात सांगायचं झालं तर अप्रतिम सिनेमा, कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि अर्थात दिग्दर्शनसुद्धा. भालजी पेंढारकर सोडले तर डॉ काशीनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा योग मला आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यानं प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या.”

राज ठकरे असंही म्हणतात, “आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की, ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही पात्रं उभी केली आहे. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय कडक!” असं म्हणत त्यांनी सिनेमाचं कौतुक केलं आहे.

सिनेमात दाखवलेला काळ हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. कोरोनात्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे आणि नटांच्या संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणं नाट्यवेड्या मराठी माणसांच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहांच्या बाहेर हाऊसफुल्ल चे फलक कायचे लागू देत असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.