राज ठाकरे यांची सोनिया गांधी यांच्या चाणक्याशी झाली होती चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न हे राजकीय घडामोडीचे पेव बनल्याच्या बातम्या रोज नव्याने समोर येऊ लागल्या आहेत. सोनिया गांधी यांचे कधी कळीचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेस पक्षात चांगलेच वजन असणारे नेते खा.अहमद पटेल यांनी राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला लावलेली उपस्थिती या चर्चेचे मूळ असल्याचे निदान राजकीय जाणकारांनी काढले आहे.

राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांनी लग्नाचे निमंत्रण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हि दिले होते मात्र ते दोघे हि या विवाहासाठी आले नव्हते. परंतु सोनिया गांधी यांचे निकट वर्तीय अहमद पटेल यांनी मात्र राजपुत्राच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. त्याच लग्नात अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्यात बंद खोलीत २० मिनिटे चर्चा झाल्याची बातमी आज बाहेर पडली आहे. राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात झालेली चर्चा हि राज ठाकरे यांच्या मनसेचा महाआघाडीत सहभाग करण्याच्या दृष्टीने झाली आहे असे बोलले जाते आहे.

लोकसभा निवडणुकीला मनसेसाठी राष्ट्रवादी दोन जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय आहे. मात्र काँग्रेसच्या सहमती शिवाय राष्ट्रवादी हा निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून अहमद पटेल यांच्याशी राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे असे बोलले जाते आहे. परंतु नवाब मलिक आणि जयंत पाटील यांनी मात्र राज ठाकरे यांच्या मनसेला काँग्रेस आघाडीत प्रवेश मिळू शकत नाही असे हि म्हणले आहे. त्यामुळे मनसेचे काय होणार या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास अद्याप अवकाश आहे.