हे एकट्याचं डोकं नाही, सोनू सूदबाबत राज ठाकरेंनी उपस्थित केली ‘ही’ शंका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन करण्यात आले होते. या संकट काळात अनेकांना आपल्या घरी जाण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मदत केली होती. खासकरून स्थलांतरीत मजूरांना आपल्या गावी जाण्यासाठी सोनू सूदने मोठी मदत केली होती. परप्रांतिय मजूरांसाठी त्याने मोफत बससेवा, रेल्वे गाड्यांची व्यवस्था करून सोनू सूदने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. अजूनही तो लोकांना मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने शेतात राबणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना मोठी मदत केली होती.

सोनू सूद करत असलेल्या कामाचे अनेकांनी कौतुक केले. तसे त्याच्या कामावर काही नेत्यांनी टीका देखील केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनू सूद करत असलेल्या कामाचे कौतुक केलं होतं. मात्र आता राज ठाकरे यांनीच सोनू सूद याच्या आर्थिक क्षमतेबाबत शंका उपस्थित केली आहे. सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे, ते भविष्यात कळेलच, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांना मदत केली. त्याच्या कामाची प्रशंसा झाली, तितकीच त्याच्यावर टीका देखील झाली. मात्र, त्याने आपलं काम सुरुच ठेवलं आहे. आता सोनू सूद गणेशभक्तांसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहेत. याबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता त्यांना आपले परखड मत मांडले आहे.

राज ठाकरे म्हणाले, सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे, असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे ? त्यामागे कोण आहे ? हे एकदा तपासले पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तो चांगलं काम करतोय याबद्दल दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल, असं राज ठाकरे म्हणाले.