राज ठाकरेंचा योगी आदित्यनाथांना कडक इशारा, म्हणाले -‘… तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं वक्तव्य केले होते. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल माध्यमात पोस्ट करत योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ ?
योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत सांगितलं होत की, स्थलांतरित मजुरांना राज्यस्तरावर विमा देण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्यात या कामगारांच्या सुरक्षेसाठी यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरण करण्याची गरज भासणार नाही. तसेच आता ज्या राज्यांना युपीचे मजूर पुन्हा बोलवायचे असतील तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांचे उत्तर
योगी आदित्यनाथ यांनी नव्या नियमांसंदर्भात ट्विट केल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला आहे. ट्विट करत राज यांनी आपले मत मांडताना, ” उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्या पुढे महाराष्ट्रात येता नाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.” असं त्यांनी म्हटलं.

राज्य सरकारला केलं आवाहन
योगी यांच्या इशाऱ्यावरून राज यांनी महाराष्ट्र सरकारला देखील सल्ला दिला आहे. ” महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलिस स्टेशन मध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं देखील आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.