पंतप्रधान नरेंद्र मोदी फकीर नसून बेफिकिर : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शहीद जवानांच्या नावाने मत मागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर नसून बेफिकिर असल्याची बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईच्या काळाचौकी भागातील शहीद भगतसिंग मैदानात झाली त्यावेळी ते बोलत होते. तसेच शिवसेनेला मतदान करू नका असेही आवाहन त्यांनी केले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे देशावरचे संकट असून कोणत्याही परिस्थितीत हे दोघे देशाच्या राजकीय क्षितीजावरती दिसता कामा नयेत. यासाठी शिवसेनेला देखील मतदान करू नका कारण शिवसेनेला मतदान म्हणजे या दोघांना मतदान, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आवाहन केले.

भाजपकडे माझ्या प्रश्नांवर उत्तर नाहीत म्हणून माझे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत वाट लावत आहेत, म्हणून ह्यांचे वाभाडे काढत आहेत, असे राज यांनी स्पष्ट केले.

You might also like