मनसेचं ‘शॅडो’ कॅबिनेट तयार ? राज ठाकरेंकडून उद्या घोषणा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या 9 मार्च रोजी 14 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत शॅडो कॅबिनेटच्या नियुक्त्या आणि रचनेवर अंतिम हात फिरविण्यात आल्याचे समजते. राज्यातील सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आणि खातेनिहाय माहिती घेण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा मनोदय यापूर्वी राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. उद्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसेच्या या शॅडो कॅबिनेटची घोषणा होऊ शकते.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये 25 ते 28 नेते असतील. तसेच यामध्ये अमित ठाकरे यांना स्थान देण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर यांच्याकडे गृह, संदीप देशपांडे यांच्याकडे नगरविकास, नितीन सरदेसाईंना वित्त, तर रिटा गुप्ता यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग देण्यात आला आहे. तसेच अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत आणि रणजीत शिरोडकर हेदेखील शॅडो कॅबिनेटमध्ये असतील, असे सूत्रांनी सांगितले.

उद्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे या शॅडो कॅबिनेटची घोषणा करतील. या कॅबिनेटचा कालावधी किती वर्षांचा असेल हे उद्याच समजेल. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार कसा सुरू आहे, याचा आढावा आणि माहिती घेण्यासाठी हा उपक्रम मनसे राबवत आहे. या शॅडो कॅबिनेटमध्ये माजी आमदार आणि आजी-माजी नगररसेवकांनाही संधी देण्यात आली आहे. शॅडो कॅबिनेटच्या पदाधिकार्‍यांनी कामकाज कसे करावे, याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

असे असू शकते मनसे शॅडो कॅबिनेट

– बाळा नांदगावकर : गृह

– संदिप देशपांडे : नगरविकास

– नितीन सरदेसाई : वित्त

– दिलीप धोत्रे : सहकार

– राजू उंबरकर : कृषी

– अमेय खोपकर : सांसकृतिक, गढ किल्ले

– अभिजीत पानसे : शालेय शिक्षण

– गजानन राणे : कामगार

– योगेश परुळेकर : पीडब्ल्यूडी

– संजय नाईक : परिवाहन

– रिटा गुप्ता : महिला, बाल कल्याण

– किशोर शिंदे : विधी आणि न्याय